दिवस ठरला, रामाला जशी विभीषणाने साथ दिली तशी साथ प्रतापराव मोरेंनी राजांना दिली. जावळीत सुखरूप नेणे आणि बाहेर सोडण्याची जबाबदारी घेतली. अवघे १०० धारकरी घेऊन जावळी पाडायचा बेत ठरला. रघुनाथ पंत आणि संभाजी कावजी यांनी १०० धारकरी घेऊन जावळीस जावे आणि या धारकऱ्यानी बाहेर जंगलात दबा धरून रहायचे. संभाजी कावजी आणि रघुनाथ पंत यांनी मोरेंना दरबारात जाऊन भेटायचं आणि नंतर बाहेर बसलेल्या धारकऱ्याना इशारत करायची.
१५ जानेवारी १६५६ दिवशी ठरलेल्या नियोजनाने दोघे मावळे १०० धारकरी घेऊन जावळीस निघाले. संभाजी कावजी आणि रघुनाथ पंत मोरेंच्या दरबारात आले. बाहेर १०० धारकरी दबा धरून बसले होते. चंद्रराव म्हणजेच यशवंतराव मोरे मद्याच्या नशेत सिहांसनावर बसले होते. स्वराजाच्या मावळ्यांना बघताच हसून म्हणाले,”या ! काय म्हणतोय तुमचा शिवाजी?” “चंद्रराव! रंगू वांकडेस स्वाधीन करा अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील” पंतांनी ठणकावून सांगितले.
वाघाच्या गुहेत जाऊन वाघालाच जेरबंद करायचं धाडस रघुनाथ पंत आणि संभाजी कावजी यांनी केलं होते. पंतांचा बोलणं ऐकताच चंद्रराव चवताळून उठले,” आमच्या दरबारात येऊन आमचा अवमान करण्याचे धाडस करता, जेरबंद करा यांस, मुंडकी उडवा यांची”, चंद्रराव कडाडले. चंद्रराव चे सैनिक जागेवरून हलताच तोच संभाजी कावजींनी रौद्ररूप धारण केला आणि समोर येईल त्याला कापत सुटले. केवढं हे धाडस, दरबारात जीवाची तमा न बाळगता राजांच्या अवमानाचा बदला घेण्याच्या विचाराने संभाजीस वेडेपिसे केले होते. गडबड गोंधळ झाल्याने मोरेही दचकले. सैरावैरा पळू लागले.
हनुमंतराव मोरे पंतावर चालून आले. तुंबळ युद्ध चालू झाले. मोरेही मोठ्या बहादुरीने लढत होते. बाहेर असलेले धारकरी आत घुसले. ‘हर हर ,महादेव’ च्या गर्जनेने जावळी दुमदुमगली होती. जेवढे चंद्ररावाचे सैन्य पडत होते, तेवढे मावळे हि पडत होते. दोन वाघांची झुंज व्हावी तशी काहीशी झुंज मोरेंच्या दरबारात चालू होती. रक्ताच्या थारोळ्या जागोजागी पडल्या होत्या.
मोरेंची ताकद मोठी पण राजांना जावळी द्यायची आणि त्यांचा झालेला अवमान याचा बदला या गोष्टी साठी प्रत्येक मावळा लढत होता आणि पडत होता. यशवंतराव व हनुमंतराव दोघेही वाड्याच्या आत गेले होते. त्यांस पकडण्यास मावळ्यांचा डाव फसत होता. का? का तर एक जावळीचा धारकरी त्यांच्या समोर भिंतीसारखा उभा होता.
निधड्या छातीचा, पिळदार मिश्या, उंच रुबाबदार महाडचा तो ढाण्या वाघ ४० जणांना एकटा मागे सारत होता. वीज चमकावी तशी त्याची तलवार चमकत होती. पापणी लवायच्या आत त्याचा वार अंगावर बसत असे. अश्या चपळाईचा वीर त्यांच्या समोर उभा होता. तुफान रणतांडव मावळे व त्या जावळीच्या वाघामध्ये जुंपले होते. इकडे मावळ्यांस या धारकारीने अडवून ठेवले होते. याचाच फायदा घेत हनुमंतरावाने यशवंतरावास रायरीस जाण्यास सांगितले. संभाजीने हनुमंतरावास हेरले अन तडक समशेर घेऊन निघाले. दोघांत चांगले जंग जुंपले पण राजांचा केलेला अवमान संभाजीच्या कानात घुमत होता. त्याच रागाने एक जबरी फटका हनुमंतरावास बसला व तो कोसळला.
शिवाने तांडव माजवावा तसं तांडव जावळीच्या शिपायाने माजवला होता. तानाजी, येसाजी, संभाजी यांच्यासह ४० धारकरी त्यांनाही दाद देत नाही हा शिपाई तरी कसला! मागे जाऊन दोर टाकून जस जाळीत अडकावं तसं जावळीच्या वाघाला अडकवलं होतं. कोणताही मावळा त्याच्या जवळ जाण्यास धजावत नव्हता. तेवढ्यात शिवाजी राजे आले आपल्या मावळ्यांच्या शौर्यावर बेहद खुश होते तेवढेच मोरेंच्या त्या वाघावरतीही. राजे हळूहळू शिपाई समोर आले. स्वराज्याच्या वाघासमोर जावळीचा वाघ जाळ्यात अडकला होता. महाराजांनी स्मित हास्य करत त्याला मोकळे सोडायचा आदेश दिला. शिवरायांचा आदेश ऐकून मावळ्यांना धक्काच बसला. कारणही तसंच होते, होताच तसा तो नरवीर मुरारबाजी.
संपुर्ण लेख लिहला असता तर बरे …. वाचायला पण मुड येतो…. थोडे थोडे वाचल्यामुळे प्रतिक्षा वाढते व कधीकधी टाईम भेटला नाही तर वाचायचे पण राहुन जाते…. ईतीहखसाचे एक एक प्रकरण संपूर्ण लेखात लिहिले तर बरे होईल…. लेख उत्तम आहे.