आज सकाळी एक सुंदर कीर्तन ऐकत होतो. त्यात कीर्तनकरी महाराज तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र सांगत होते आणि सांगत असताना त्यांनी दोन ओळी अश्या सांगितल्या ज्याने मी थोडा गोंधळात पडलो. ते म्हणतात, प्रपंच हा पहायचा असतो आणि परमार्थ हा करायचा असतो.
हे ऐकल्यावर मनात झालेल्या गोंधळाचं निरासन होण्या आधीच एक टाळकरी एक भक्ती गीत गातो.
तुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
तुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम
तुझे रूप चित्ती राहो…..
देह धारी जो जो त्यासी विहित नित्यकर्म,
सदाचार नीतीहुनी आगळा न धर्म
तुला आठवावे गावे, हाच एक नेम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम….
संत गोरा कुंभार यांनी रचलेले हे गीत आणि सुधीर फडके यांनी या गीताला दिलेले संगीत आज हि मनाला तेवढंच भावतं. महाराज असे का म्हणाले याचा विचार करीत असताना मला हरिपाठ मधली एक ओवी आठवली,
!कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां!
म्हणजे नुसता शांत उभा राहून देव प्रसन्न नाही होणार तर भजन करावं लागेल त्यांचं नामस्मरण करावं लागेल. तिकडे काही तरी केले पाहिजे. पण प्रपंच मध्ये जर काही केलेच नाही तर नुकसान तर होईलच. हि माझी शंका पण मनातून काही जात नव्हती.
तेवढ्यात महाराज म्हणतात तुकोबांनी काहीच केले नाही, असं नाही. प्रपंच केला ‘नीटनेटका’, पण जेव्हा तुकोबांना विश्वास वाटला कि देव आहे तेव्हा ते म्हणतात
घालूनिया भार राहिलो निश्चिंती । निरविले संती विठोबाशी ।। १ ।। लाऊनिया हात कुरुवाळीला माथा । सांगितले चिंता न करावी ।।
तेव्हा त्यांनी चिंताच सोडली या प्रपंचाची आणि परमार्थ करत राहिले.
शेवटी वेळ कशी हि असो, त्यात समाधान असणं खूप गरजेचं आहे. काहीही होउदे, ‘बरे झाले’ म्हणण्याची ताकद असली पाहिजे. अनेक आघात जेव्हा आपल्यावर कोसळतात तेव्हा आपण झाडाच्या पानासारखं झडून जातो. परत उभं राहायची जिद्द नाही येत.
अश्या वेळी तुकोबा त्यांच्या शब्दात सांगतात.
बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ॥
अनुतापे तुझे राहिले चिंतन । जाला हा वमन संवसार ॥
बरे झाले देवा बाईल कर्कशा । बरी ही दुर्दशा जनामध्ये ॥
बरे झाले जगी पावलो अपमान । बरे गेले धन ढोरे गुरे ॥
बरे झाले नाही धरिली लोकलाज । बरा आलो तुज शरण देवा ॥
बरे झाले तुझे केले देवाईल । लेकरे बाईल उपेक्षिली ॥
तुका म्हणे बरे व्रत एकादशी । केले उपवासी जागरण ॥
तुकोबांचं सगळं काही गेले तरी ते म्हणतात ‘बरे झाले’, महाराज सांगतात कि तुकोबांनी प्रपंचात राहून परमार्थ साधला त्यासाठी कुठे हिमालयात जायची गरज नाही भासली.
तुकोबा आपल्याला पण हेच सांगतात,
।। नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची।। न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण।। ठायीचं बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा।। रामकृष्णहरि विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ।। याविण आणिक असता साधन । वाहतसे आन विठोबाची।। तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनी । शहाणा तो धनी घेतो येथे।।
प्रपंचात राहून परमार्थ साधताना तुकोबांना कसलीच अडचण नाही आली. देव देव करत राहा असं मी नाही म्हणत पण कुठेतरी यातून आत्मशांती मिळत असेल तर विठ्ठल विठ्ठल करत राहणं कधीही चांगलं.
ज्ञानोबांना जर विचारलं असतं की, तुम्हाला संसारातली कोणती गोष्ट आवडते तर कदाचित त्यांनी हेच उत्तर दिले असते.
॥ समाधि हरिची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥ बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥ ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥ ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥