त्या भल्या मोठ्या वृक्षाखाली थोड्या गप्पा झाल्यानंतर आम्ही वरती निघालो, वाटेतच उजव्या बाजूला पाण्याचे कुंड दिसले. ते पाणी पिण्यासाठी आणि इतर कामासाठी वापरता येईल. अशी त्या कुंडाची रचना केली होती. आमच्यातला एक जण त्या कुंडपाशी गेला तेव्हा जंगम ने त्यांना इशारा केला की पाणी प्यायचं आहे इकडे चपला घालून येऊ नका
.
पौरोहित्य करणारा समाज म्हणून जंगम समाज ओळखला जातो. जंगम ही लिंगायत गुरूची जात. जंगम लिंगाचे उपासक म्हणून जंगम. प्रत्येक लिंगायताला गुरू असावाच लागतो.
त्यामुळे जंगम वर्गाला महत्त्व आहे. यात गुरुस्थल (विवाहित)आणि विरक्त(ब्रह्मचारी) असे दोन गट पडतात. हा समाज विखुरलेला आहे. प्रत्येक गावात असला तरी याची संख्या फार नाही. पौरोहित्य हाच त्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत असलातरी आजची जंगम पिढी शिक्षणावर भर देऊन सरकारी नोकरीत काम करण्याची इच्छा व्यक्त करतात.
थोडं पाणी पिउन नंतर आमच्या बाटल्या रिकाम्या केल्या आणि त्यात हे थंडगार पाणी भरलं. पाणी अस की उभं आयुष्य जाईल शहरात पण या चवीचं पाणी मिळणं मुश्किल. त्यातल्या त्यात मी थोडा नशीबवान होतो. कारण सुरवातीची दहा वर्षे माझी गावाकडे च गेली. आमच्या गावाच्या बाहेर च ओढा होता आणि जिकडे ओढा नदीकडे संपतो. तिकडे पाण्याचं कुंड होतं. आईला विचारायचो,”मी हे पाणी येत कुठून?” आई म्हणायची,” डोंगरातून येत”.
मी खाली वाकून बघत असे कुंडीत तर फक्त पाणी आणि खेकडे असायचे. आणि डोंगर इतक्या लांब कसं काय पाणी येत असेल??
आईला मी असाच सारखं विचारून तिला भांबावून सोडायचो. आई पाण्याकडे निघाली की आमची मजा असायची आम्ही तिच्या आधी कुंडीजवळ येऊन थांबायचो. त्या पाण्यात खेळत असायचो मग आई आली की पळायचो. आई नंतर ते पाणी काढी, 2 ते 3 वेळा ते पाणी काढून घेई. कुंडीत पाणी सतत चालू असे त्यामुळे ते लवकर भरे. मग ते शुद्ध पाणी हंड्यात भरून घेई. आणि आपल्या वाटेला जात. 3 ते 4 मिनटं च चालणं असायचं. या 3 ते 4 मिनिट मध्ये आमच गावातल्या मंदिराकडून फिरून होई.
अश्याच विचारात पुढे चालत राहिलो आणि थोड्याच अंतरावर रायरेश्वराच मंदिर नजरेत आले.