सोमनाथ नेहमीप्रमाणे ऑफिस वरून घरी आल्यावर आराम करायच्या बेतात असतो. घरी आल्यावर त्याची 5 वर्षाची मुलगी आरु त्याच्यासोबत खेळायचा हट्ट करते.
सोमनाथ तिला नाही म्हणू शकत नव्हता. खेळू म्हणत बोलून सोमनाथ बेड वर पडतो ते झोप झाल्यावर उठतो. उठल्यावर त्याला स्वतःचा खूप राग येतो. एकाच गोष्टी मुळे त्याची चिडचिड होत राहते. त्याला जिथे तो काम करत असतो ते काम आणि तेथील वातावरण याचा त्याला वीट आलेला असतो.
तो सतत विचार करत असतो की कामातून सुटका कशी होईल. वेगळं काम करता येईल का? दुसरं काही काम भेटेल का? निवृत्ती स्वीकारली तर मिळणारे उत्त्पन्न आहे त्यात किती दिवस भागवू शकतो. इतका पर्यंत त्याचा विचार चाललेला असायचा. पण इतके वर्ष काम करून त्याला त्याच कामाची माहिती असते. आणि इतर ठिकाणी तेवढा पगार ही भेटणार नाही. या दोनच परिणामाचा विचार करून मनात आलेले नैराश्याला तसच दाबून ठेवत सोमनाथ दिवस ढकलत राहतो.
ते काम त्याच्या आवडीचं नसतं आणि जे आवडीचं होतं ते काम तो खूप आधी करत होता पण त्यातून काही उत्त्पन्न निघेल याचा त्याला अंदाज नव्हता. म्हणून त्याने सरळ नोकरी करायचा निर्णय आधीच घेतला होता पण याच निर्णयाचा त्याला एक दिवस वीट येणार याचा अंदाज नव्हता.
असाच विचार करत बसलेला होता त्याची मुलगी आरु खेळत असते, तिला श्लोक बोलायला खूप आवडतात. शाळेतल्या स्पर्धेत तिला बक्षीस ही मिळाले होते. यावेळी तिला वक्तृत्व स्पर्धेत एक विषयावर काही ओळी बोलायच्या होत्या. श्लोक च्या स्पर्धेत तिचं नाव नव्हते यावेळी. हे कळताच सोमनाथ त्याच्या बायकोला म्हणाला तिच्या शाळेत जातो आणि त्यांना जाबच विचारतो.
त्याची कामात होणारी चिडचिड तो तिच्या शाळेवर काढत होता. त्याला वाटायचं निदान माझ्या मुलीला तरी आवडीचं क्षेत्र मिळावं. पण तो तिच वय सुध्दा विसरला होता की ती अजून 5 वर्षाची आहे तिला तिचं क्षेत्र निवडायला बराच काळ आहे.
एवढ्यात त्याची छोटीशी आरु म्हणाली,” पप्पा नका चिडू, मी यात पण आवडीने स्पर्धेत भाग घेईल आणि बक्षीस मिळवून देईल”
तिचं हे उत्तर त्याला अनपेक्षित होतं. किती प्रगल्भता असते लहान मुलांत आणि आपण मोठेपणी असलेल्या मोठेपणात ही प्रगल्भता विसरून जातो. तिचं हे उत्तर त्याच्या साठी सुखद धक्का होता. नकळत तिने त्याच्या मनातील होणाऱ्या नैराश्याच उत्तर दिले होते, ‘आवडीचं नसलं म्हणून काय झालं, जे आहे ते आवडीने करू’. तेव्हापासून मग त्याने स्वतः मध्ये बदल केला. त्यानेही विचार केला उगाच कामात चिडचिड करून काही होणार नाही. आवडीचं काम नसेल पण जे काही काम असेल ते आवडीने केले तर कदाचित मनाची चिडचिड तरी थांबेल.
वेगळ्या कामाचा विचार करून स्वतःची आणि घराची फरफट होण्या पेक्षा हा निर्णय चांगला होता. बरेच सोमनाथ आहेत असे याच फरफट मध्ये जगत राहतात प्रत्येकाला आवडीचं क्षेत्र मिळतच अस नाही, ज्यांना भेटत ते मनापासून त्यात काम करतात ज्यांना भेटत नाही त्यांना मन लावून काम करावं लागतं. कसही असो काम करणं महत्वाचं.
मग ते आवडीचं काम करा किंवा आवडीने करा…