जावळी भौगोलिक दृष्ट्या कोकणपट्टा आणि पश्चिम महाराष्ट्रामधील घनदाट अरण्याचा भाग होय. इकडे जाणे म्हणजे स्वतःला कायमचं हरवून बसण्यासारखे आहे. जावळीत असं म्हणतात कि, हिडंम्बेच्या केसात उवा शोधाता येईल पण जावळीत हत्ती शोधणे अवघड आहे. याच जावळीत वासोटा किल्ला आहे. हाच किल्ला राजे बंदीवानासाठी वापरत असत. राजेंनी ७०० इंग्रजांना इकडेच डांबून ठेवले होते.
जावळी ताब्यात येणं सोप्पी गोष्ट नव्हती. राजांनाही जावळीचे भौगोलिक महत्व ठाऊक होते. जावळी ताब्यात आली कि संपूर्ण कोकण किनार पट्टी आणि खुल्या समुद्रावर स्वराज्य प्रस्थापित करता येणार होते. एवढी मोठी संधी राजे सोडतील कसे? जावळी हि आदिलशाहीचा भाग असला तरी त्याची घडी राजांनीच बसवली होती.
आदिलशाही सल्तनत मध्ये दौलतरावांचा फार लौकिक होता. त्यांच्या पराक्रमामुळे आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा ‘किताब दिला होता. तेव्हा पासून मोरे घराण्यास चंद्रराव हा ‘किताब बहाल झाला. अदिलशाही सल्तनत मध्ये दौलतराव हे निपुत्रक वारले, घरभेदी आणि वाईचा सुभेदार यांकडून जावळीस धोका होता. म्हणून दौलतराव यांच्या पत्नी मानकाबाई यांनी शिवरायांस विनवणी केली. तेव्हा ३५ वर्षीय असलेल्या यशवंतराव मोरेस जावळीचे अधिपती केले. मानकाबाईंनी यशवंतरावास दत्तक घेतेले होते. ज्या राजांमुळे यशवंतरावांना जावळी सारखा प्रदेश मिळाला त्याच राजांना कालांतराने हे मोरे विसरले, आणि आदिलशहा शी हाजी हाजी करत राहिले. राजांना हि बाब खटकत होती. तरी राजांनी धीर सोडला नव्हता.
वयाच्या १४ व्या वर्षांपासून राजे न्याननिवाडा करीत होते, रांझ्याच्या पाटलाचा निवडा प्रसिद्ध होता. तश्याच प्रकारचा निवाडा रंगू त्रिमल वांकडें याबद्दल करायचा होता. पण त्यावेळी तो जावळीमध्ये लपून बसला होता. या यशवंतरावाने त्यास आश्रय दिला होता. एवढेच निम्मित जावळी पाडायला राजांना पुरेसं होतं आणि राजांनी तेच केलं. नुसतीस जावळी नाही पाडली तर त्यातून समुद्र मंथनातून जसे रत्न निघावे तसाच काहीसा रत्न राजांना या जावळीत घावला. जावळी वरची चढाई करण्याआधी राजांनी रघुनाथ पंत आणि संभाजी कावजी यांना चंद्रराव मोरे यांच्याकडे पाठवले. मोरेंच्या दरबारात आल्यावर त्या दोघांनी मुजरा केला, त्यांना पाहून चंद्रराव मोरे जरा मग्रुरीत म्हणाले, “बोला काय म्हणतात?”
रघुनाथ पंत म्हणाले,” आम्ही शिवाजी राजे भोसले यांच्या कडून आलो आहोत, रंगू त्रिमल वांकडें याचा निवाडा करायचा आहे. त्याने एका विधवेशी बदफैली केली आहे आणि अश्यास तुम्ही आश्रित केलं आहे. त्यांना आमच्या हवाली करावे.” रघुनाथ पंतांच बोलणं होण्याच्या आत, मद्याचा पेला फेकत यशवंतराव कडाडले,”कोण हा शिवाजी ?” “ते राजे आहेत.” रघुनाथ पंत उत्तरले. संतापाने लालबुंद झालेला यशवंतराव म्हणाला,”बादशाह म्हणा हवं तर, पातशाही नसली तरी पातशाह म्हणून घेण्याची भारी हौस तुमच्या शिवाजीला”. मोरेंच्या दरबारी हशा पिटला. एवढ्यात यशवंतरावांचा मुनीत हनुमंतराव मोरे उच्चारला,”तुमच्या शिवाजीला राजे म्हणून घ्यायची भारी हौस”. राजांचा चालेला अवमान संभाजींना बघवत नव्हता. त्यांनी तलवारीला हाथ घातला, तेवढ्यात पंतांनी त्यांना शांत केलं. दरबारात असलेला रंगू वांकडें याला मात्र राजांची धास्ती वाटू राहिली.
यशवंतरावाने रंगू वांकडें यास हवाली करण्यास नकार दिला, रघुनाथ पंत उच्चारले,”हे बरोबर नाही रंगू वांकडें सारख्या बदफैली माणसाला आश्रय देऊन तुम्ही घोडचूक करत आहात. शिवाजी राजे हे कदापि सहन करणार नाही. याचा परिणाम वाईट होईल. “परिणामाची तमा या चंद्रराव मोरेंनी उभ्या आयुष्यात केली नाही, म्हणावं त्या शिवाजीला हिम्मत असेल तर जावळीत ये, परत जाऊ शकणार नाहीस, तुम्हाला जर प्राण प्रिय असेल तर चालते व्हा इथून.” असे म्हणत यशवंतरावाने त्यांस जाण्यास सांगितले. रघुनाथ पंत आणि संभाजी कावजी यांनी दरबार सोडला.
दरबारात असलेला रंगू त्रिमल वांकडें यास खात्री पटली की, जोपर्यंत जावळीत आहोत तो पर्यंत सुखरूप आहोत. चंद्रराव म्हणजेच यशवंतराव मोरे चा अवतार बघून त्याच्या जीवात जीव आला होता. पण त्याला पुढचे माहित नव्हते. रंगू त्रिमल वांकडें हा जावळीच भविष्य संपवायला आला होता. म्हणतात ना माणसाच्या पावला मागे त्याच कर्म हि चालत येत तसंच झालं. रंगू त्रिमल वांकडें च्या निम्मिताने राजांनी जावळीच भविष्य बदललं.