कधी कधी कळतं नसत आपल्याला , आपण कोणा विरुद्ध आहोत? खरं तर या जगात आपण च आपले शत्रू झालो आहोत त्या साठी बाहेरच्या शत्रू ची गरज काय. आपणच आपल्या स्वप्नांना मूठमाती देतो, आपणच आपल्या मनावर दडपण ठेवून चुकीच्या निर्णयाला होकार देतो, इच्छा नसतानाही वाकडी वाट धरतो, आणि इच्छा असूनही मनाविरुद्ध वागतो.
मनाची झालेली धगमग नुसती पाहत राहायची, मन कितीही बोलू दे, साफ डोळेझाक करत आपण जगणं रेटायचं, आजचा दिवस कधी संपतोय याची वाट बघायची. परत दिवस उजाडला की, आहे तसा ढकलायचा.
आणि कोणी विचाराल कसं काय, काय चाललंय? एकदम मजेत तुम्ही सांगा, अस बोलून मोकळं व्हायचं, पण मनातल्या जाणिवेला डांबून ठेवायचं. अश्या वेळी आवाज उठवायचा तरी कोणा समोर, मनाच्या घालमेलीला दोष तरी कोणाला द्यायचा? शुद्ध हरवल्यागत दिवस घालवण्यापेक्षा पेक्षा एकदा आरश्यात असणाऱ्या स्वतःला विचारा, हेच करायचं होतं का तुला? यासाठीच का तू रोज उठतोस? या साठीच का इथपर्यंत सगळं सहन केलंस?
कधी कधी प्रश्न पडतो, आपण रोज उठलंच पाहिजे का? केव्हा तरी असाही दिवस येऊ दे, उठायची गरज नसेल पण तरी ही पडल्यापाडल्या पूर्ण जग फिरून येऊ. रोजच्या आयुष्याच्या गोष्टी जरा दुरून पाहता आल्या असत्या तर त्यातली गम्मत तरी कळली असती. इकडे दिवस कधी उगवतो कधी मावळतो हेच कळत नाही यातली गम्मत कशी कळणार?
कळली पाहिजे ना, म्हणून तर माणसाच्या जन्माला आलो, नाहीतर बसलो असतो एक झाडावर सफरचंद खात. शोध लावला पाहिजे गमतीचा, लहान मुलांच बरं असतं नुसतं हसत राहील तरी त्यांना कोणी येड नाही म्हणत , आपण पण सहज हसायला लागलो तर , उगाच हसायचं, माणस बोलतात काय येड लागलंय उगाच हसतोय? आपल्याला इकडे पण कारण लागत? मग आपल्या जगण्याचं कारण काय? कधी केला विचार का जगतोय याचा? कोणी नाही करत, तुम्ही जरी स्वतःला विचारलं तरी जवळ च कोणतीतरी कारण शोधुन द्याल. आमचं काय आत्ता चाललंय ते पोरासाठी? सगळीकडे हेच कारण पुरत. Sweet and simple.
स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्वतःच्या आयुष्यासाठी जगलं पाहिजे. पण ते इतराकरिता. जगण्याच्या आनंद एकट्याने कधी घेऊ नये, त्याला राक्षशी आनंद म्हणतात. सर्वांसोबत जो सुखी असतो त्याला दुःखात सावरायला त्याच्या सोबत बरेच असतात ज्यांच्या सोबत त्याने आनंद वाटलेला असतो.
आरश्या समोर असलेल्या माणसाकडे जरा बघून हसा, त्याला धीर द्या आणि सांगा त्याला मित्रा काळजी नको करू, अजून बरंच काही बाकी आहे. तुम्ही जर स्वतःला शत्रू समजत असाल तर एक लक्षात ठेवा, शत्रूला संपवायचं असेल तर त्याला मित्र बनवा.