पूर्वी गुरुकुल पद्धती ही शिक्षणाची आदर्श पध्द्ती होती. साक्षात भगवान कृष्ण यांनी सांदीपनी ऋषी च्या आश्रमात राहून विद्यार्जन केले. वरतंतू नावाचे एक ऋषी होते. त्यांचा कौस्य नावाचा शिष्य होता. वरतंतू च्या आश्रमात राहून कौस्याने विद्यार्जन पूर्ण केले. पूर्वी गुरुदक्षिणा ची प्रथा होती.
शिष्याने शिक्षा पूर्ण केल्यावर शिष्य गुरूंना गुरुदक्षिणा देत असत. पण वरतंतू ऋषींना गुरुदक्षिणा अमान्य असे म्हणून ते आपल्या शिष्याकडून गुरुदक्षिणा घेत नसत. कौस्य आपली शिक्षा पूर्ण करून ऋषी चा निरोप घेण्यासाठी निघाला. वरतंतू चे आशीर्वाद घेताना त्याने ऋषींना गुरुदक्षिणा काय देऊ? म्हणून विचारले. वरतंतू ऋषींनी हसतच त्याला म्हणाले, “काहीही नको, मी शिकवलेल्या विद्येचा योग्य उपयोग कर, म्हणजे झालं?”
पण कौस्य अडूनच बसला, “नाही तुम्ही काहीतरी घेतलच पाहिजे”. त्याचा असा आततायी पणा बघून ऋषींना अजूनच हसू आले. त्यांनीही ठरवलं बघूया आपला शिष्य किती ताकदीचा आहे ते. त्यांनी त्याच्याकडे चौदा कोटी सुवर्ण मोहरा मागितल्या.
कौस्य जरा विचारात पडला, मुनींच्या आश्रमातून बाहेर पडून तो थेट रघु राजा कडे गेला. रघु राजाने नुकतेच विश्वजित यज्ञ केले होते. त्यामुळे त्याचा खजिना रिकामा झाला होता. त्याच्या कडे देण्यासारखं काहीच नव्हते. फक्त एक मातीचं भांड होतं. पण अतिथीला रिकाम्या हाती पाठवण्याची राघूकुळाची रीत नाही हे तो जाणून होता. त्याने कौस्य ला विचारले कौस्यने चौदा कोटी सुवर्ण मोहरा मागितल्या.
रघु राजाही विचारात पडला आता करायचं काय? यज्ञ संपन्न झाला होता. त्यामुळे आपण कोणावरही विजय मिळवू शकतो असा विश्वास रघु राजाला होता पण कौस्य ची मागणी पूर्ण करणारे एकही राज्य नव्हते. मग लढाई करायची तरी कोणासोबत? याच विचारात असताना राजन ला कुबेर आठवला. आणि रघु राजाने ठरवलं की कुबेर सोबतच युद्ध करायचं.
कुबेर ला माहिती पडताच. त्याकाळचे असलेले गूगल मुनी म्हणजेच नारद मुनी यांना बोलावलं आणि त्यांना ही सगळी भानगड काय आहे ते विचारलं. नारदांनी सर्वकाही सांगितले.
यज्ञ बद्दल ही सगळी माहिती घेतल्यावर कुबेरांनी युद्ध टाळण्याचे ठरवले. आणि आकाशातून चक्क सुवर्ण मोहरांचा पाऊस पाडला.
तेव्हा रघु राजा कौस्य ला म्हणाला, “आपल्याला हव्या तेवढ्या मोहरा घ्या”. कौस्यने मोजून चौदा कोटी मोहरा घेतल्या. त्या वरतंतू ऋषींना दिल्या. आपल्या शिष्याचा चातुर्य पाहून ते ही धन्य झाले.
बाकीच्या मोहरा लोकांनी वेचल्या आणि परस्परांना प्रेमाने दिल्या. त्या दिवशी जी तिथी होती ती दशमी. तिची तिथी पुढे विजयादशमी म्हणून साजरी होऊ लागली. ज्या झाडावर सोन्याच्या मोहरा पडल्या ते झाड आपट्याचे होते म्हणून त्या झाडाची पाने सोनं म्हणून लुटतात.
दसरा हा सण विजयासाठी साजरा करतात. पूर्वीच्या दिवशी स्वारीवर याच शुभमुहूर्तावर निघायचे.याच दिवशी शहाजी राजे माँसाहेबांना आणि बाळ शिवाजींना घेऊन बंगलोर ला गेले होते.
हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही कामाला यश मिळणारच अशी श्रद्धा आहे. विजयादशमी म्हणजेच विजय देणारा दिवस.
आयुष्याचा प्रत्येक दिवस हा विजय देणारा दिवस असावा, सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा