हत्ती माहितीच असेल, जगातला सर्वात बलवान आणि बुद्धिवान प्राणी. त्याचंच प्रतीक म्हणून आपण आज गणपतीला पूजतो. आज बाप्पाचं विसर्जन.
या निमित्ताने एक गोष्ट आठवली, हत्तीचं लहान पिल्लू खूप खोडकर असतं. त्याला मस्ती करायला खूप आवडतं, तो इकडून तिकडे धावत असत, लोळत असतो. माहुताला ते बघून खूप आनंद वाटायचा.बघायला खूप गोंडस होतं ते सगळं.पण एक दिवस माहूत मरण पावला. मग आता हत्तींची काळजी कोण घेणार? म्हणून दुसऱ्या माहुताला सांगण्यात आलं. तो हत्तींची नीट काळजी घेत होता. पण त्या लहानग्या हत्तीचं खेळणं त्याला काही पचले नाही.
त्याने त्याला जाड रस्सीने बांधून ठेवले. आता ते छोटंसं पिल्लू जोर लावतोय, पळतोय, धडपडतोय पण ती रस्सी काय त्याच्या कडून तुटेना. असेच दिवस गेले रोज ती रस्सी तोडायचा प्रयत्न करायचा, दमायला की थकून झोपायचा.पण ती रस्सी काय तुटायची नाही. मग तो इतर हत्ती प्रमाणे शांत झाला. त्याने धावायचा, लोळायचा नाद सोडून दिला आणि शांत राहू लागला. माणसं त्याला चांगलं बोलू लागले कारण तो त्यांच्या मनाप्रमाणे वागू लागला. ते पिल्लू आत्ता मोठं झालं होतं, इतरांप्रमाणे च चारा खात आणि शांत राहत.
एक दिवस हत्तींचा सांभाळ करणारा माहूत गावी गेला. मग तिथलेच सफाई कर्मचारी हत्तींना बघू लागले. एकवेळी असं झालं की, हत्तींना अंघोळ करून आणण्यात आले आणि नंतर मग जागेच्या मालकाने जाड साखळ्या आणल्या होत्या. म्हणाला, ” त्या रस्या काढा आणि या साखळ्या लावा”
कामगारांनी तेच केले. पण नंतर थोड्या वेळात गोंधळ सुरू झाला, हत्ती ते साखळ्या तोडू लागले. त्यांना त्या साखळ्या नको होत्या. त्यात एक चांगल की हत्ती बाकी काही नुकसान करत नव्हते. मालकाला प्रश्न पडला आता करायचं काय? साखळ्या तोडत आहेत आणि रस्सी तर त्याहून कमजोर होत्या, त्याला काही सुचेना तो लगेच गावी गेलेल्या माहुताला बोलवणे धाडतो.
माहुताला सगळं काही कळल्यानंतर तो त्याच जुन्या रस्या घेतो आणि त्या हत्तींना बांधतो. आणि हत्ती शांत होतात. आश्चर्य हे आहे की हत्ती जे साखळदंड त्या रस्सी पेक्षा 10 पट मजबूत आहेत ते तोडतात पण ती रस्सी तोडत नाही. जी लहानपणापासून त्यांच्या गळ्या भोवती आहे.ही गोष्ट आपल्याला सुद्धा तंतोतंत लागू होते. यातून हत्तींची मानसिकता कळते. जे लहानपणी त्यांनी खरं मानलं तेच मोठेपणी खरं मानू लागले. खरं तरी काही वेगळंच असते आणि त्याची शहानिशा करायची गरज ही त्यांना वाटत नाही.
नेमक्या याच पद्धतीने आपण जगत आहोत. काही उदाहरणे बघूया.
1. मुली सारखं काय रडतोस, मुलगा आहेस be स्ट्रॉंग.
2. मारामारी काय, धावपळ काय मुलगा आहेस का मस्ती करायला?
3. तुला वर्गात पहिलं यायचा आहे.
4. चांगले मार्क्स मिळाले तर साईन्स नाहीतर कॉमर्स
5.मी सांगतोय तेच करायचं स्वतःच डोकं चालवायचं नाही.
6. एकदा नोकरी लागली की तुझ्या मागची कटकट गेली.
7. घर बघायचं, मुलाला सांभाळायचं नोकरी करून काय करणार?
8.लग्न करायचं आहे तर आधी घर घे.
9.घरच्या जबाबदारी पुढे स्वतःची स्वप्ने बघायची नसतात.
10.नोकरी बघ, धंदा बुडावतो माणसाला आपलं काम नाही ते.
11. नोकरी कर नाहीतर धंदा कर अस नाचून, गाऊन, खेळून कसं भागावणार?
12. जो काहीतरी देईल त्यालाच आपलं मत द्यायचं. मग तो कसाई का असेना.
ही आणि अश्याच प्रकारच्या रस्या आपल्या गळ्यात लहानपणापासून आहेत. पण आपल्याला त्या तोडता येत नाहीत.
मुलांना पण रडू येत, पण त्यांना सांगितले जाते रडू नकोस.
मुलींना सांगितल जातं तुमचं घरातलं काम बाहेर नाही पडायचं.
धंद्या बाबतीत सगळ्यांना एकमत आहे. मराठी माणसाला धंदा करता येत नाही.
शिक्षणाच्या बाबतीत मुलांची आवड काय हेच बघितले जात नाही.
या सारख्या अनेक मापदंडाच्या रस्या वर्षानुवर्षे आपल्या मनावर आणि मानेवर आहेत.त्या तोडता येत नसेल तर किमान आपल्या येणाऱ्या पिढीवर तरी लादू नका.
तुम्ही सुद्धा स्वप्न बघायचं सोडू नका, वेळ कधीच कोणाची जात नाही फक्त आपण आपली स्वप्ने जपता आली पाहिजे. मोकळ्या रानातल्या हत्ती सारख.
*स्वतंत्र*
*त्या लहान हत्ती सारखंच बरेच जण रस्सी तोडायचा प्रयत्न करीत असतात. पण ते काही वेळाने प्रयत्न करायचा सोडून देतात. आणि ती मानसिकता आपल्या मनावर लादून घेतात की त्यांच्या कडून रस्सी तुटू शकत नाही. तुमच्यातील तो धडपडणारा हत्ती मरू देऊ नका. जो पर्यंत रस्सी तुटत नाही तोपर्यंत प्रयत्न करत रहा. एक दिवस ती रस्सी नक्की तुटणार आणि ती मानसिकता ही तुटेल. माणसाची प्रगती फक्त तोच स्वतःच थांबवू शकतो जर त्याने स्वतःची मानसिकता बदलली तर तो अफाट प्रगती करू शकतो.*
*चंद्रकांत उभे*
*(Majeman.com)*