महाराष्ट्र आणि कर्नाटकातला एक जुना पारंपरिक गोड पदार्थ.मुंबईला इतकासा माहीत नसेल पण गावी दिवाळीत हमखास केले जातात ते म्हणजे “चिरोटे”.तसे चिरोटे करण्याच्या दोन पद्धती आहेत पाकातले चिरोटे आणि बिनपाकातले.पाकातले चिरोटे जास्त काळ टिकत नाही जास्तीत जास्त दोन तीन दिवस, बिनपाकातले चिरोटे त्यामानाने जास्त काळ टिकतात.
चिरोट्यांच पीठ माळण्याचे प्रकारही वेगळे वेगळे आहेत.काहीजण मळताना पाणी घालतात काही दूध तर काही दूध पाणी दोन्ही मिळून घालतात .तर काही फक्त मैद्याचे करतात किंवा काही मैदा आणि रवा मिक्स करून मळतात. शेवटी आवड निवड आणि घरात काय काय जिन्नस उपलब्ध आहेत त्यावर आहे.
- साहित्य:
३/४ कप मैदा
१/४ कप रवा
१ टेस्पून तूप मोहनासाठी
चिमुटभर मीठ
अंदाजे १/४ कप दुध३ ते ४ टेस्पून तूप, वितळलेले
२ ते ३ टेस्पून कॉर्न फ्लोअर
तूप किंवा तेल चिरोटे तळण्यासाठी
१ कप साखर + ३ ते ४ टेस्पून पाणी, गोळीबंद पाकासाठी - कृती:
१) रवा आणि मैदा एका बोलमध्ये घ्यावा. त्यात १ टेस्पून कडकडीत गरम तूप घालावे. चिमूटभर मीठ घालून चमच्याने मिक्स करावे. अंदाज घेउन दुध किंवा पाणी घालावे आणि मध्यमसर घट्ट असा गोळा भिजवावा. २० मिनिटे झाकून ठेवावा.
२)भिजवलेल्या गोळ्याचे समान भाग करावे. प्रत्येक समान भागाचे गोळे करून त्यातील ३ गोळे घेउन बाकीचे गोळे नंतरसाठी झाकून ठेवावे. प्रत्येक गोळ्याची पातळसर पोळी लाटावी.
३) २ ते ३ टेस्पून तूप घेऊन ते चांगले फेटून त्यात २ ते ३ टीस्पून कॉर्न फ्लोअर घालून पेस्ट बनवावी. यालाच साटा अस म्हणतात.
४) पोळपाटावर १ लाटलेली पोळी घ्यावी. त्यावर बनवलेला साटा पसरवावा. त्यावर दुसरी लाटलेली पोळी बरोबर पहिल्या पोळीवर येईल अशी ठेवावी. या पोळीवर पुन्हा साटा लावून त्यावर तिसरी पोळी ठेवून उरलेला साटा यावर लावावा.
५) तिन्ही एकावर एक ठेवलेल्या चपात्यांचा घट्ट रोल करून एक एक इंचाच्या लाट्या कापून घ्याव्यात
६) मधल्या वेळेत साखर आणि पाणी एकत्र करून गोळीबंद पाक करावा. आच बंद करावी.
७) जेव्हा दोन्ही रोल थोडे सुकतील, तेव्हा कढईत तूप गरम करावे. रोलचे १ इंचाचे तुकडे करावे. एक तुकडा घेउन लेयर असलेली बाजू वर अशाप्रकारे ठेवून हाताने दाब देउन चपटे करावे. लाटणे फिरवून साधारण अडीच इंचाची पुरी बनवावी. अशाप्रकारे सर्व चिरोटे बनवावे. तयार झालेले चिरोटे तुपात मंद आचेवर तळावे.
८) चिरोटे सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. तळलेले चिरोटे स्टीलच्या चाळणीत उभे करावे म्हणजे अधिकचे तूप गळून चाळणीत जमेल. जेव्हा चिरोटा थोडा कोमट होईल तेव्हा चिरोटा साधारण गरम असलेल्या पाकात घालावा. मिनिटभर ठेवून बाहेर काढावा.चिरोटे गार झाले कि वर पाकाचे छान ग्लेझिंग येते. बिनापकातले हवे असतील तर मग बाहेर काढून एका मिनिटांनी एक एक चिरोटे पिठीसाखरेत घोळवून बाजूला ताटात काढून ठेवावे. चिरोटे एकावर न ठेवता थोडे वेगवेगळे ठेवावेत. - टीप्स:
तुपाऐवजी तेल किंवा डालडा वापरला तरी चालेल. पण तुपामुळे चव जास्त खमंग लागते.
साखरेचा पाक गोळीबंद करावा. एकतारी किंवा दोनतारी केल्यास चीरोट्यात पाक शोषला जावून चिरोटे नरम पडतील.
मोहनासाठी वापरलेले तूप कडकडीत गरम असावे. नाहीतर चिरोटे नरम पडतील.
कॉर्न फ्लोअरऐवजी तांदुळाचे पीठही वापरू शकतो.
मळलेल्या पीठ २० मिनिटे झाकून ठेवल्यावर घट्ट होवू शकते कारण रवा ओलेपणा शोषून फुगतो. अशावेळी चमचा-दोन चमचे दुध घालून पीठ परत मळावे.
साखरेच्या पाकात चिरोटे घालायचे नसल्यास, चिरोटे तळल्यावर बाहेर काढावे. १-२ मिनिटांनी चिरोट्यावर पिठीसाखर भुरभुरावी.
पोळ्या किती ठेवाव्यात हे आपल्यावर आहे नाहीतर नुसत्या एका पोळीला साटा लावून तिचा रोल करून सुद्धा बनवता येत आणि साटा बनवायचा नसेल तर मग तूप चांगल फेटून पोळीला लावयच आणि त्यावर मैदा किंवा तांदळाचं पीठ भुरभुरल तरी चालेल.
जर पुरी लाटायची नसेल तर लाटी कापलेल्या बाजूने प्रेस करून एकदा उभ आणि एकदा आडव लाटण फिरवून चिरोटे तळून घ्यावे.