दिवाळी म्हटलं की सगळीकडे कसं लखलखीत आणि प्रसन्न वातावरण पसरत,पण जसजशी ही दिवाळी जवळ येऊ लागते तशी बायकांची धाकधूक वाढते.
कारण कामांची यादी भली मोठी असते. साफसफाई ,फराळ,रांगोळी आणि सगळ्यात महत्वाचं शॉपिंग करायची असते. दिवाळीची सुरवात घराच्या साफसफाईने होते आणि शेवट हा पोटभर फराळ,रंगीबेरंगी रांगोळ्या आणि दिव्यांच्या प्रकाशात होते.
दिवाळीत मुलांची हौस आणि चंगळ असते.नवीन कपडे,फटाके आणि सगळ्यात महत्वाचं मनसोक्त फराळ अगदी पोट फुटेपर्यंत.
पण हा फराळ बनवणं आणि तो न फसता बनवणं यात खरी गृहिणीची कसरत असते आणि त्यात सगळ्यात जीव काढते ते म्हणजे चकली. कधी नरम होते तर कधी जास्तच कडक.
अशीही चकली बनवण्याची सोपी पद्धत आणि योग्य प्रमाण कळलं तर तेवढाच जीव भांड्यात पडेल.
चकली कोणतीही करा आणि कितीही योग्य प्रमाणात करा पण ती तळताना जर नीट काळजी घेतली नाही तर सगळ्या मेहनतिवर पाणी म्हणून सगळ्या प्रकारची चकली तळण्यासाठी एक खास टीप:
तेल कढईत मध्यम आचेवर तापवून घ्यावे . तेल गरम होणे जरी आवश्यक असले तरी मोठ्या आचेवर तापवून त्यातून धूर निघू देऊ नये .
चकल्या अशा तेलात हमखास करपतात .
छोटा पिठाचा गोळा घालून तो पटकन वर आला की समजावे की तेल तापलंय .
मग अलगद चकल्या सोडाव्यात , आणि त्या तेलाच्या पृष्ठभागावर तरंगेपर्यंत त्यांना झारा लावू नये .
त्यांचा आकार घट्ट झाला की मग त्या उलटाव्यात आणि मंद आचेवर आतपर्यंत शिजेपर्यंत तळून घ्याव्यात .
चकल्यांना तळायला वेळ लागतो ( किमान ४ ते ५ मिनिटे ) .
जर घाई केली तर अर्धकच्च्या राहतात आणि काही वेळातच सांदळतात !
चकल्या जशा आतपर्यंत शिजल्या की तेलाचे बुडबुडे थोडे शांत होतात मग समजावे की त्या शिजल्या .
त्यांना टिश्यूपेपरवर काढून थंड कराव्या व हवाबंद डब्यात ठेवाव्यात