मग मी माझ्या वाटेला निघालो, गावाच्या वेशी पाशी आलो. गाव तस छोटंसं पण स्वच्छ होतं, हिरवेगार डोंगर तीन बाजूला आणि एका बाजूला नदी वाहते. कोणाला नाही आवडणार इकडचा परिसर. वळणावळणाचे रस्ते, विरळ पण हिरवी झाडे, निळंशार आभाळ, कौलारू घर, घराबाहेर जनावरांचा गोठा आणि दारा समोर तुळसी वृंदावन व त्याभोवती रांगोळी.
किती मस्त होत ते सगळं. प्रदूषण हा प्रकारचं नाही तिकडे. हळू हळू गावात प्रवेश केला. तर प्रवेशद्वारा वर द्वारपाल असतो तस जणू काही तिकडे शाळा उभी होती, माझं शिक्षण किती आहे? कदाचित असं विचारत असेल.
शाळा छोटी होती पण तिचं शिक्षण मात्र मोठं होत. मनातूनच प्रणाम केला आणि पुढे निघालो. मग पटांगण आणि मंदिर दिसलं. मनातच म्हणालो किती सुंदर रचना आहे ही, सुरवातच आपल्याला आधी शिकण्या पासून करते मग खेळाकडून शेवटी मंदिरापर्यंत.
यात मी उगाच आयुष्याचा अर्थ शोधू लागलो.
माणसाने पण आधी जी जमेल ते शिकून घ्यावं. हवं तेवढं शिकावं. जे जे गरजेचं आहे ते शिकावं मग आयुष्याच्या खेळात असं खेळावं कि सगळे बघत राहिले पाहिजे. पण खेळून बाजी मारून शेवटी विसरू नये कि कर्ता करविता तो आहे आपण निमित्त मात्र. मग आयुष्याचा खेळ खेळून झाला कि त्या हरीचा जप करत राहावं.
ती जागा सोडून जावंस वाटत नव्हतं, मग चालत राहिलो संध्याकाळ झाली. कुठेतरी थांबावं म्हणत होतो मी. पण आपल्याला हॉटेल ची सवय,बाहेर कुठे थांबायचं झालं तर तीच सोय. इकडे गावात थांबणार कोणाकडे? कोणी ओळखीचं पण नाही.
ब्रम्ह प्रकटावा तसा एक माणूस पाठमोरा प्रकटला. मग कानावर तोच दीर्घ आवाज पडला. “काय पाहिजे?” मला आवाज ओळखीचा वाटला. मागे बघितलं तर हेच महाशय होते, ज्यांनी मला चहा सोबत भजी दिली होती. मी त्यांच्या कडे गाऱ्हाणं मांडलं. आणि त्या बाबानी माझी रहायची सोय केली.
वय ८० च्या वर असेल पण अजूनही चालताना कोणाचा आधार नव्हता. त्यांनी मला त्यांच्या घराकडचा रस्ता दाखवला, आम्ही गावामधून निघालो.
चालताना मी आजूबाजूचा प्रदेश बारकाईने बघत होतो, कौलारू घर, कमी उंचीची होती, लाल-तांबूस माती आणि दगडांनी उभ्या केलेल्या भिंती. शेती घराच्या आसपास होती, इकडचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने बाहेर जाऊन काम करणारी चाकरमानी इकडे कमीच.
चालताना बाबा बोलत होते, “पाहून, इकडे सहसा कोणी परकं माणूस येत नाही, ओळखीचं येत, तरी अलीकडं बरीच माणसं यायला लागलीत म्हणून लागोलागी हा रस्ता खडी टाकून केलाय बघा” नाहीतर इकडं कोण येतंय रस्ता बनवायला”या! आलं घर माझं”, आजच्या राती इथंच निजा “,”मग सकाळ बघा तुमचं तुम्ही” मी वयाने त्यांच्या नातवा एवढा असेल तरी बोलण्यात किती आदब. मी त्यांना उगाच आरेकारे करत होतो.
त्यांच्या घराची रचना खूप मस्त होती आपल्या शहरात असत तस बेडरूम हॉल किचन इकडे पण आहे पण त्याला एक रचना आहे. आधी एक पडवी येते तिकडे गुरे बांधतात मग एक वटी(मुख्य जागा) तो त्यांचा हॉल त्यानंतर किचन आणि देवघर(देवा साठी स्वतंत्र खोली असते) आणि मग अडगळीची जागा.
वरती पोटमाळा सुद्धा असतो तिकडे गुरांचा चारा पावसामुळे ओला होऊ नये म्हणून घरात पोटमाळ्यात ठेवतात. पावसाळा संपून जेव्हा हिवाळा सुरु होतो तेव्हा बाहेर गंज रचतात.