माणसाने वाट फुटावी तिकडे चालत राहावं…. मी पण चालत राहिलो जो पर्यंत मला कोणाला आवाज द्यायची गरज नाही वाटली. पण आजू बाजूला बघतो तर कोणचं नाही, आवाज देऊ तरी कोणाला? परत पायी चालत राहिलो. कोठे जायचे ठाऊक असणाऱ्यांना प्रवास कितीही लांबचा असल्यावर कंटाळवाणा नाही वाटत, पण माझं तसं नव्हतं, कुठे जायचं हे मी कधी ठरवून नाही निघत. काहींना काही शोधायचा प्रयत्न असतो. काही वेळ चालत राहिलो आणि एक छोटीसी टपरी दिसली. मनात पहिला विचार आला एवढ्या दुर्गम भागात नेटवर्क सापडावं तशी हि टपरी इथे, याची टपरी चालत तरी असावी का?
म्हंटल चला, त्यालाच विचारून बघावं. आवाज दिला, कोणी आहे का? आतून एक दिर्घ स्वर कानात पडला, काय पाहिजे? क्षणात वाटलं. हा कोणी तपस्वी साधू तर नाही, ज्याची मी तपस्या भंग केली असून आता तो मला विचारात आहे, काय पाहिजे? म्हणून. जसा हा दुसरा अंबानीच. मी मागितलं तर लगेच मला देणारा? मग मी हि जरा थबकत च विचारलं, इकडे आसपास वस्ती नाही का कोणती? त्याने तर जणू माझ्यासाठी प्रश्नच तयार ठेवले होते. म्हणाला, “कोठे जायचे आहे?”
मग मी म्हणालो, मी असच भटकंती करत आहे. नविन जागी फिरायला आलो आहे. चालता चालता या भागात आलो तर, काहीच दिसेना. बराच अंतरा नंतर तुमची टपरी दिसली, सांगाल का मला? मी कुठे आहे ते? त्या क्षणाला मला न राहून google map ची आठवण झाली. त्याने जास्त न काही विचारता झटकन सांगितलं असत माझं ठिकाण.
तो म्हणाला,”खालच्या अंगाला गेलात तर ओढा लागेल त्या ओढ्याला पकडून सरळ खाली जावा तिकडे वस्ती आहे. बघा तिकडून कुठे जायचं असेल तर.”मी धन्यवाद म्हणालो आणि निघणार तेवढ्यात त्यांनी विचारलं,”चहा बनवू का?” आता बनवू का म्हंटल तर वेळ जाणार आणि तसहि मला कुठे ऑलिम्पिक ला जायचं होते, मी पण मग बनवा असं सांगून तिकडेच बसलो.
वाटलं विचारावं. बाबा हि टपरी चालते का तरी? पण उगाच कश्याला कोणाला दुखेल असं बोलायचं म्हणून शांत राहिलो. चहा घेतला, मस्त बनवला होता, गवती चहा चा सुंगध त्यात आल्याची चव, अश्यावेळेला गरम भजी असती तर वेगळीच मजा!
असं मनात आलं आणि समोर त्या बाबाने चक्क गरम भजी ठेवली पण, मला इतका आनंद झाला कि, असं वाटलं क्षणासाठी देव व्हावं आणि याच्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात, धन्यवाद बोलून मी चहा-भजी चा कार्यक्रम आटोपता घेतला.