“रेझांग ला ची लढाई” (Battle of Rezang La )
“शेवटचा माणूस आणि शेवटच्या गोळी” पर्यंत चाललेली लढाई. (Battle till the Last Man and Last Bullet )

२१ नोव्हेंबर १९६२ या दिवशी चीन ने युध्दविरामची घोषणा केली. २० ऑक्टोबर १९६२ पासून सुरु झालेल्या या युद्धात चीनने भारताचा बराच भूभाग बळकावला होता. जसे कि सर्वानी ऐकले असेल की हे युद्ध चीनने जिंकले होते. परंतु असे काय झाले कि २१ नोव्हेंबर ला चीनने एकाएकी युद्ध संपले म्हणून घोषित केले ?
याचं उत्तर होते ३ दिवस आधीच्या म्हणजेच १८ नोव्हेंबर १९६२ ला झालेल्या रेझांग खिंडी च्या लढाईत. हि लढाई म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या मोजक्या अविश्वसनीय लढायांपैकी एक. जगभरातील सैनिकांना प्रेरणा देणारी हि लढाई म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी एक गौरव.

ठिकाण : रेझांग ला, १८००० फूट उंचीवरील दक्षिण लडाख मधील एक खिंड.

महत्व : दक्षिण लडाखचे प्रवेशद्वार. रेझांग ला वर नियंत्रण म्हणजे लडाख वर नियंत्रण. चुशुल मधील Airforce च्या airfield वर ताबा.

म्हणूनच चुशुल च्या संरक्षणासाठी, रेझांग ला मध्ये शेवटच्या चौकीची जबाबदारी होती ‘मेजर शैतान सिंग’ आणि १३ कुमाऊ रेजिमेंट च्या १२० जवानांवर. हे १२० जवान म्हणजे हरियाणा मधील अहिरगढ चे “वीर अहिर” उंच, दणकट शरीरयष्टी असलेले. या जवानांकडे अत्यंत मोजका दारुगोळा आणि साधारण बंदुक ज्या कि दुसऱ्या महायुद्धानंतर कुचकामी म्हणून गणल्या गेल्या होत्या.

“मृत्यूचे तांडव”

१८ नोव्हेंबर १९६२ , चुशुल मध्ये होत असलेल्या सततच्या हिमवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली होती. पहाटे ३:३० वाजता चिनी आर्मीच्या ५०००-६००० सैनिकांनी रेझांग ला वर अचानक हल्ला केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मेजर शैतान सिंग यांनी आर्मी मुख्यालयाशी संपर्क केला , अतिरिक्त सैन्य कुमक आणि दारुगोळा ची मागणी केली. परंतु समोरून उत्तर मिळाले कि ” हिमवृष्टी आणि पर्वतीय बाधेमुळे ताबडतोब मदत पाठवणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या चार्ली कंपनीला घेऊन मागे येऊ शकता, निर्णय तुम्हाला घ्यायचाय , over and out.”
मेजर शैतान सिंग यांनी सर्व जवानांना परिस्थितीची जाणीव दिली आणि सांगितले जो कुणी मागे जाण्यास इच्छुक असेल त्याने जावे, परंतु मी पोस्ट सोडणार नाही. मागे हटतील ते अहिर कसले. एकही जवान मागे जाण्यास तयार नव्हता . सर्वानी गगनभेदी युद्धघोष केला ” कालिका माता कि जय ” आणि सुरु झाली हि ऐतेहासिक लढाई. शैतान सिंग यांनी योजना आखून छोट्या तुकडी तयार केल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना नेमले. चिनी सैनिकांनी एकामागून एक असे ५-६ हल्ले केले. प्रत्येक वेळे ७००-८०० सैनिक चाल करून येत.
स्वतः मेजर शैतान सिंग एका पोस्टवरून दुसरीकडे धावत जाऊन सैनिकांना निर्देश देत आणि त्यांचे मानोबल वाढवत होते. परंतु त्यांच्या जवळील दारुगोळा संपत आला. समोरून येणाऱ्या चिनी सैनिकांवर हे वीर अहिर तुटून पडले गोळ्या संपल्या तर बंदुकीच्या बट ने डोके उडवू लागले. कुणी दोन्ही हातानी चिन्यांची डोकी दगडावर आदळू लागले. अशातच मेजर शैतान सिंग गंभीर जखमी झाले. त्यांना रामचंद्र यादव या जवानाने एका आडोशाला नेले. शैतान सिंग यांनी त्या जवानाला खाली कंपनी मुख्यालय कडे जाण्याची ऑर्डर दिली. खाली जाऊन सर्वाना १३ कुमाऊ च्या ” वीर अहिरांच्या” या अतुलनीय पराक्रमाची कल्पना देण्यास सांगितले.
पहाटे ३:३० ते सकाळी ८-९ पर्यंत चाललेल्या या लढाईत भारताच्या १२० पैकी ११४ जवानांनी सर्वोच बलिदान दिले. पाच जवान युद्धकैदी झाले व नंतर त्यांची सुटका झाली. त्या रात्री चीनने १३०० हुन अधिक सैनिक गमावले. (काही स्रोतांनुसार १८३६ चिनी सैनिक मारले गेले) रेझांग ला मध्ये चिनी सैनिकांच्या शवांचा खच पडला होता. मेजर शैतान सिंग यांनी केलेल्या या मृत्यूच्या तांडवामुळे चीन पुरता बिथरला होता.
म्हणूनच पुढे २१ नोव्हेंबर १९६२ ला युद्धविराम ची घोषणा केली.

पुढे २-३ महिन्यांनी हिवाळा संपला आणि सैनिकांच्या शरीराचा शोध सुरु झाला. तेव्हा बर्फाच्छादित रेझांग ला च्या त्या रात्रीच्या थराराची कल्पना आली. भारतीय जवानांच्या सर्व शरीरात गोळ्या लागलेल्या होत्या तरीदेखील हातात बंदूक होत्या, कुणी गंभीर जखमी असून देखील हातात ग्रेनेड धरलेल्या अवस्थेत होते. अशातच एका आडोश्याला आढळले एक पार्थिव, हातात , पोटात गोळ्या लागलेल्या, पायाच्या अंगठ्याला एक दोरी बांधलेली आणि त्या दोरीचे दुसरे टोक मशिनगन च्या ट्रिगर ला बांधलेले, ते होते मेजर शैतान सिंग..! मरणोत्तर परमवीरचक्र ( सर्वोच्च सन्मान ) ने सन्मानित.

आज त्यांच्या त्या उच्चकोटीच्या पराक्रमाचा स्मृतिदिन . या अमर हुतात्म्यांची हि वीरगाथा आठवून त्यांना वाहिलेली हि श्रद्धांजली.•

By Chandrakant Ubhe

like to Reading New thing, Travel, listening music and watching movie

Related Post

One thought on “Battle of rezang”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *