मी या स्थितीत आलो याचे कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे समजू नये. प्रयत्नाने व कष्टाने मी वर चढलो. मी तीन फक्कड गुरु केले. माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली.
माझ्या उन्नतीला ते कारणीभूत झाले. माझे पहिले सर्वश्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध.
– पहिले गुरु बुद्ध – दादा केळुस्कर नावाचे माझ्या वडिलांचे विद्याव्यासंगी स्नेही होते. त्यांनी बुद्धाचे चरित्र लिहिले होते. मला एका प्रसंगी त्यांनी बक्षीस दिले. ते पुस्तक वाचल्यावर मला अगदी वेगळाच अनुभव आला. उच्चनीचतेला त्या धर्मात स्थान नाही.
मी बौद्धधर्माचा उपासक बनलो. जगामध्ये बौद्धधर्मासारखा धर्म नाही आणि भारताला जगवायचे असेल तर त्या धर्माचा भारताने स्विकार करावा, असे मला आज हि वाटते.– दुसरे गुरु कबीर –
माझे दुसरे गुरु कबीरसाहेब. त्यांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता. गांधींना मी नुसते गांधी न म्हणता ‘महात्मा गांधी’ म्हणावे अशी मला आग्रहाची पत्रे आली व येतात, पण त्या बाबतीत कोणाचे म्हणणे मी जुमानले नाही. मी त्यांच्या पुढे कबीराची उक्ती ठेवीन – ‘ मानस होना कठीण , तो साधू कैसा होत ‘ – तिसरे गुरु महात्मा फुले –
माझे तिसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचे मला मार्गदर्शन मिळाले. या तीन गुरूच्या शिकवणीने माझे जीवन बनले आहे. – तीन उपास्य दैवते – तीन गुरूप्रमाणे माझे तीन उपास्य दैवतेही आहेत. माझे पहिले उपास्य दैवत विद्या.
विद्याशिवाय काही होऊ शकत नाही. या देशात प्रचंड बहुसंख्येने समाज हा विद्याहीन आहे. अन्नाप्रमाणे माणसाला ज्ञानाची गरज असते. खरा प्रेमी ज्या उत्कंठेने प्रेयसीवर प्रेम करतो त्याच प्रकारे माझे प्रेम माझ्या पुस्तकावर आहे. शत्रूलाही कबुल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादन केले पाहिजे.
तुम्ही माझ्या दिल्लीच्या निवासस्थानी आलात तर तेथे तुम्हाला माझा वीस हजार निवडक पुस्तकांचा संग्रह दिसेल. मी विनयपूर्वक विचारतो, अशी संपत्ती दुसऱ्या कुणाजवळ आहे? दाखवा!
माझे दुसरे उपास्य दैवत विनयशीलता आहे. पण हे खरे की, मी नेहमीच विनयशील असतो असे नाही. मात्र विनय म्हणजे लीनता, लाचारी नव्हे. मी लीनता ला त्याज्य मानतो. माणसाने नेहमी स्वाभिमानाने जगले पाहिजे.
समाजकार्याचे ध्येय मी डोळ्यापुढे ठेवले. पण चरितार्थासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही. समाजकार्यासाठी मी सरकारी नोकरीत अडकलो नाही. परळला १० बाय १० च्या खोली मी अनेक वर्षे काढली. कण्याची भाकरी आणि कण्याचा भट खाल्ला. पण मी कधी कोणाकडून स्वतःसाठी थैली घेतली नाही.
या देशात आलेल्या सर्व व्हाईसरॉय आणि गव्हर्नरांशी माझा स्नेहाचा सम्बन्ध होता. पण मी माझ्याकरिता त्यांच्या कडे कधी कसलीही याचना केली नाही. दुसर्यांना मदत होईल अश्या गोष्टी मी त्यांच्या कडून करून घेतल्या.
मला सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश होता आलं असतं, पण त्यात अडकून समाजकार्याच्या दृष्टीने काय होण्यासारखे आहे, असं विचार केला. मी माझ्या बुद्धीप्रमाणे चाललो. परमेश्वराला काय वाटेल याचा विचार मी कधी केला नाही. परमेश्वराला मी न मानणारा माणूस आहे. म्हणून शीलसंवर्धन हे माझे तिसरे उपास्य दैवत समजतो.
माझे ध्येय
मी वर्गीकृत लोकांत जन्मलो. त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावे, याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणातच केली होती. यापासून मला पदच्युत करणारी अनेक आमिषे आलीत व गेली.
फक्त स्वतःचेच चांगले करायचे मी ठरविले असते तर हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्या तिल अत्यंत श्रेष्ठ पदाचा उपभोग घेतला असता. परंतु मला लोकांच्या उन्नतीप्रीत्यर्थ मला माझे आयुष्य वाहायचे होते.
हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्वाचा अवलंब करीत आलो आहे- ते तत्व म्हणजे , जे कार्य सफल करण्याचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो ते कार्य पार पाडणे होय. ज्याच्या मनाला एकसारखे लागून राहिलेले आहे, त्याने ते कार्य पार पाडण्यासाठी आकुंचीत विचारसरणीचा व कृतीचा अवलंब केला तरी ते श्लाघ्य होईल.
वर्गीकृत लोकांच्या हिताहिताचा प्रश्न सरकारने फार दिवस त्रिशंकूप्रमाणे लोम्बकळत ठेवलेला आहे. हे पाहून मला किती वेदना झाल्या असतील याची तुम्हाला कल्पना येईल.
अस्पृश्यांना संदेश
माझ्या पंचावन्नाव्या वाढदिवशी तुम्ही खास अंक काढीत आहात, यासाठी तुम्हाला संदेश देत आहे. आपल्या हिंदुस्थान देशात राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषप्रमाणे मान दिला जातो, हि दुर्दैवाची गोस्ट आहे. हिंदुस्थानाबाहेर केवळ महापुर्षांच्याच जयंत्या साजऱ्या केल्या जातात, पण हिंदुस्थानात अवतारी पुरुष व राजकीय पुरुष या दोघांचेही जन्मदिवस पाळले जातात.
हे असे असावे हि दुःखाची गोस्ट आहे.
आयुष्याच्या शर्यतीत भाग घेण्याचे आमंत्रण सर्वाना येते, पण फार मोठे लोक त्यातून उत्तीर्ण होतात असे का? त्याचे कारण हेच कि भविष्याच्या गरजेसाठी वर्तमानातल्या विलासांचा त्याग करावयास लागणारे धैर्य किंवा निर्धार पददलित माणसाजवळ नसतो.
म्हणून आयुष्याच्या या शर्यतीमध्ये त्यांना मोठेपणा मिळत नाही. अस्पुरशांच्या झगड्याची व हालाची मला जाणीव आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी माझ्यापेक्षाही जास्त छळ त्यांनी सोसला आहे. असे असूनही मी त्यांना हाच संदेश देतो की, झगडा आणि झगडा. त्याग करा,.
त्यागाची व हालाची पर्वा न करता एकसारखे झगडा चालू ठेवाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. जागे होऊन प्रतिकार करायची अस्पृशांची सामूहिक इच्छाशक्ती वाढली पाहिजे. आपले कार्य पवित्र आहे यावर त्यांचा दृढविश्वास पाहिजे.
आपले ध्येय हस्तगत करण्याचा त्यांनी संघटित पाने निर्धार केला पाहिजे. गुलामगिरी वर हल्ला चढविण्यासाठी जे आपले तन-मन-धन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होत. आपली माणुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे मरणाची, वाईटाची, सुखाची, दुःखाची,संकटाची, वादळाची, मानाची, अपमानाची पर्वा न करता एकसारखे झगडत राहतील ते धन्य होतं.
(यातील झगडा याचा अर्थ संघर्ष असा घ्यावा).
या आत्मकथेच्या शेवटच्या पानावर बाबा साहेबांचे शब्द –
“मला समाजाने दूर लाथाडले, जगापासून मी दूर झालो, सार्यांनी मला दूर केलं. परंतु ह्या ग्रंथांनी मला आसरा दिला. म्हणून एखादे पुस्तक दुसऱ्याला द्यावयाचे म्हटले की , माझ्या अगदी जीवावर येते.
माझे ग्रंथालय खरेदी करणे म्हणजे माझा प्राण मागण्यासारखे आहे”.
“विद्या हे माझे उपास्य दैवत आहे,. मी त्याची चोवीस तास पूजा करीत असतो.” “पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखं दुसरा आनंद नाही.
पुस्तकं मला शिकवतात मला नवी वाट दाखवतात. म्हणून तती मला आनंदाचा लाभ करून देतात. स्नेही सोबती जोडण्याची कला माझ्या ठायी नाही.
माझी मुद्रा अतिशय कडक व उग्र दिसते यामुळे मज जवळ येण्यास लोक कचरतात. असे असणे पण अशक्य नाही.
पण माणसांपेक्षा पुस्तकांचा सहवास मला आवडतो हि गोष्ट मात्र खरी आहे”. – माझी आत्मकथा -डॉ. बाबासाहेब आंबेडकर