सर्वांच्या मनात बसणारं
सर्वाना हवं हवंस वाटणारं
गाव तसं न्यारं होतं ,
कौलारू घर पडक्या भिंती,
छोटंसं दार आणि कमी उंची,
घरात गुरं -दोर आणि धान्याची कोठारं होत,
दाराला कडी आणि दुभंगलेलं दारं होतं,
आलाच कोणी पाहुणा,
त्याला गुळ-पाणी देई,
गप्पा चालू होताच,
जेवणाची होई घाई,
आलाच तसा कोणी,
दोन घास खाऊनच जाई , भरल्या पोटाने सर्वांचा निरोप घेई,
चेहऱ्यावरच्या सुरकुत्यावर समाधान फार होतं ,
सर्वांच्या मनातलं गाव तसं न्यारं होतं.
पकडापकडी लपाछपी खेळत,
गावभर हिंडायचो,
घरात झोपून राहण्यापेक्षा मैदानी खेळ खेळायचो,
दमून थकून आल्यानंतर, गरम भाकरी खायचो,
आंब्याखाली पोतं टाकून बिनधास्त झोपायचो,
त्या गार हवेत मायेचं सारं होतं ,
सर्वांच्या मनातलं गाव तसं न्यारं होतं.
वरती नवरा-नवरीचा डोंगर,
खाली कमंडलू नदी होती,
नदीपासून उंचवटा फार,
खालून वर पहाडी होती,
सरळ मनाच्या गावात जायला
वळण मात्र वाकडी होती,
छोटं -छोटं गाव त्यात प्रत्येकाची वाडी होती,
प्रत्येक वाड्यातल अंतर जास्त काही फार नव्हतं,
सर्वांच्या मनातलं गाव तसं न्यारं होतं.