रघुनाथ पंत आणि संभाजी कावजी राजांचा झालेला अवमान गिळून माघारी फिरले. इकडे राजे चिंतीत होते, राजांसाठी प्रत्येक मावळा हा गडा इतकाच महत्वाचा होता. राजांची तीच शक्ती होती आणि अवघ्या मावळ्यासाठी राजे हे प्रेरणास्थान होते.दरबारात पंत आणि कावजी दाखल झाले. दोघांनी राजांना मुजरा केला, दोघांना समोर बघून राजे थोडे सुखावले, संपूर्ण दरबाराच्या नजरा दोघांवर खिळल्या होत्या.
“काय म्हणतात चंद्रराव मोरे ” राजे नि उच्चारले. राजांच्या चेहऱ्यावर उत्सुकता झळाळली होती. पंत म्हणाले, “राजे मोरेंनी आपली मागणी फेटाळली” आणि एवढंच नाहीतर पुढे असहि म्हणाले, शिवाजीला म्हणावं , तू जावळीत ये परत जाणारच नाही”. हे ऐकताच राजांची तळपायाची आग मस्तकात गेली, “इतकी मगरूरी इतकी मस्ती”, हा अनाठायी आणि अव्यवहारपणा आम्ही कदापि सहन करणार नाही.यशवंरावाचा मनमानी कारभार चालू देणार नाही.
“सत्तेची नशा यशवंत रावास अंध करीत आहे राजे” रघुनाथ पंत उत्तरले. ” आम्हास कल्पना आहे पंत” म्हणत राजे सिहासनावर बसले. “श्री इच्छेने आम्ही हे स्वराज्य उभे केले, या स्वराज्यात जर कोणी आई बहिणीशी गैर व्यवहार करीत असेल आणि त्याला शासन जर करता येत नसेल तर आम्ही राजे ते कसले?हेच होणार असेल तर अशा स्वराज्याचं काय आम्ही तोरण बांधायचं काय?” शिवाजीराजे उत्तरले.
संभाजीं कावजींनी विचारलं, “राजे काय करायचं?” राजांनी गर्जना केली,”जावळी पाडायची”. पंतांनी काळजीत सूर काढला,” जावळी पाडायची ?, राजे ते शक्य आहे का?” राजे म्हणाले, “होय! जावळी पाडलीच पाहिजे”.
राजांच्या नजरेत जावळी तेव्हा आली जेव्हा त्यांनी आऊसाहेब जिजाऊंची सुवर्ण तुला महाबळेश्वर मधील मंदिरात केली. आपल्या मुलाने केलेली सुवर्ण तुला म्हणजे पृथ्वी इतके दान करणे अशी धारणा त्या काळी होती. त्यावेळी जावळी चे रूप पाहून राजे भारावले होते, घनदाट जंगल भोवती दात किर्र्रर्र झाडी हे सगळं काही आपल्या स्वराज्यात असावं हे राजांना वाटणं स्वाभाविक आहे. जावळीत असलेल्या यशवंतरावांचे हि प्रताप राजांच्या कानावर येत होते. रोहीड्याच्या खोऱ्यात चिखलीच्या पाटलास व त्याच्या मुलास त्रास देऊन नाहक ठार केले. बिरवाडीच्या पाटलाची पूर्ण जमीन हस्तगत केली होती. आणि आता तर रंगू त्रिमल वांकडें यास आश्रित करून यशवंतरावाने आपल्या पापाचा घडा भरून घेतला होता.
पंतांनी काळजीपोटी राजांना आठवण करून दिली,”राजे जावळीची शिबंदी मजबूत आहे, पाठीशी महाबळेश्वर, किर्रर्र झाडी, जावळीचा एक धारकरी १५ माणसांना भारी पडतो”. जावळी जिंकण्याचा अट्टाहास अनेकांनी केला, मलिक काफूर ने ३००० सैन्यासह जावळीत आला होता त्याचा एकही माणूस माघारी जिवंत गेला नाही. महम्मद गावा याने देखील असाच प्रयत्न केला होता, त्याची हि तशीच गत झाली.
राजे म्हणाले,” पंत आम्हास ठाऊक आहे. पण स्वराज्य उभं करण्यासाठी अश्या संकटाना घाबरून चालणार नाही “, “जावळीची शिबंदी तोडा! झोडा ! फोडा ! काहीही करा पण जावळी स्वराज्यात आलीच पाहिजे”. राजांचा शब्द मागे घेण्याची ताकद कोणातच नव्हती. जावळी पाडायची तयारी सुरु झाली.
यशवंतरावाने स्वतःच्या कर्माने आणि रंगू वांकडेच्या पायाने जावळीचा नाश चालून आला होता. पण महाराजांच्या आगमनाने जावळी पवित्र आणि शुद्ध झाली होती त्याच शुद्धततेतून स्वराज्यास एक नरवीर मावळा मिळाला ज्याला आवरणं तान्हाजी सारख्या १० जणांनाही जमलं नाही. ज्याला राजांनी आपल्या गोड शब्दांनी आपल्या स्वराज्यात घेतलं होतं. जेव्हा या स्वराज्यावर सर्वात मोठं संकट आलं होत तेव्हा त्या संकटाला तोंड देण्याचा पहिला मान या स्वराज्याच्या मावळ्यास दिला होता. हाच उमराव बाजी मुरार चा मुलगा मुरारबाजी.