सातारच्या वाई तालुका मध्ये वसलेले एक छोटंसं गावं त्याच नाव वासोळे. वासोळ्याला डाव्या बाजूने दर्शन देणारी कमंडलू नदी आणि वरती राजा-राणीचा डोंगर. हिरवगार असं गाव.
पावसाळ्यात जर कधी गेलात तर तुम्ही शिमला विसरून जाल इतकं थंड आणि शांत वातावरण. “डोंगराचं नावं राजा राणी का?” मी आईला विचारलं होत लहानपणी, आई म्हणाली होती,खूप आधी डोंगरावरून लग्नाचं वऱ्हाड जात होत आणि मध्येच लुप्त झालं. त्याची दगडे बनली.
आजपण जेव्हा मी त्या डोंगराकडे बघतो तेव्हा ते वऱ्हाडच वाटतं.जुन गावं ते आमचं नंतर धोम धरण मध्ये आमच्या जमिनी गेल्या आणि आम्हाला खाली सातारा तालुका मध्ये जागा दिल्या. ते नवं वासोळे. पण माणसं तिचं.
काळ तसा ७० ते ८० दशकाचा. सगळ्यांना मुंबईचा लळा लागलेला. वरून गिरणी कामगाराची नोकरी मिळत होती त्यामुळे सोन्यासारख्या गावाला सोडून माणसे कोळश्याच्या खाणी सारखे असलेले मुंबई या शहरात आली. का? कारण हिरे याच खाणीत मिळतात. शिक्षण आणि अक्कल याचा फारसा काही संबध असतो असं मला नाही वाटत.
तरी त्यातल्या त्यात बरेच जणांनी मुंबईची वाट धरली. त्यातले जे शहाणे होते त्यांनी त्यांची नाळ गावापासून कधी दूर नाही नेली. पण ज्यांना गाव आणि मुंबई यांचं अंतर कळालं ते मात्र फसले. आणि मुंबई लाच सर्वस्व मानून राहू लागले. कधीतरी वर्षातून एकदा दोनदा फिरायला म्हणून गावी भटकंतीला जात असत. हळू हळू त्यांची मुंबई ची सवय वाढू लागली आणि ते इकडेच राहिले.
पण मला मुंबई कधीच रुचली नाही. आई सोबत राहिलेल्या गावात माझं बालपण आणि मन तिकडेच सोडून मुंबई ला यावं लागलं होत. आईने पण चांगला शिक मोठा हो बोलून मला पाठवलं.
गावात काहीच नव्हतं पण शांती होती. कसलीच धावपळ नाही , ना कसला ताण मेंदूवर, ना काही तणाव कोणत्या प्रकारचा. पण मुंबईमध्ये तस नव्हतं. इकडे प्रत्येक गोष्टीवरती तणाव असतो. ‘टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही’ या म्हणी प्रमाणे मुंबईकरांनी प्रत्येक गोष्टी मध्ये देवपण घडवायची ठरवलेलं दिसतं. त्यामुळे मुंबई मध्ये लहान मूल अंगणवाडीत गेलं तरी त्याला त्या देवपणाची सवय लावतात. गावात तस ताण तणाव नाही त्यामुळे सगळं कस निवांत आहे.
शाळेत कधी लक्षच गेलं नाही. फक्त मार्च परीक्षेची वाट बघायचो. कधी गावी जातोय याची. वर्षातले दोनच महिने आईजवळ असायचो. जसा जसा मी वाढत गेलो तस तस गाव आणि मुंबई यातलं अंतरही वाढत होतं. पहिले अंतर वर्षातून ३ महिने असायचं आता तेच अंतर काही १२ महिन्यावर आलं.
म्हणजे शिक्षण पूर्ण झालं आता हाताला काम मिळायला हवं, अनेक जण त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई मध्ये येतात. माझं असं काही स्वप्न नव्हतं. एकच होत, गावी आईजवळ वेळ घालवायचा. पण एक कृत्रिम जग तयार झालं माझ्या भोवती, ते जग नेहमी सांगत काहीतरी goal ठेव आयुष्यात, आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा कर, त्यांना पूर्ण कर, मोठ्ठ काहीतरी कर. या जगाने मला अश्या काही भ्रमात ठेवले की, मला माझ्या आईपेक्षाही जास्त महत्वाचं या जगाच्या गोष्टी वाटू लागल्या.
या धावपळीत मी माझं गाव विसरलो, तिकडच्या गोष्टी विसरलो, तिकडची माणसं सर्वकाही. पण जाणवत होत की गाव आता शहरापेक्षाही जास्त समृद्ध होत आहे. एका पिढीने घेतलेला निर्णय हा पुढच्या पिढीचं भविष्य ठरवत असतो. तेव्हा प्रत्येक पिढीने आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावा. ते सर्वस्वी योग्य ठरत. मग आमच्या घरात मुंबई ला जाऊन राहायचा हा निर्णय ही तसाच होता.
माझी आणि मुंबई ची ओळख दंगली पासून झाली. प्रभादेवी ला दोन घराच्या मध्ये मोकळी जागा होती त्यावरच पत्रा टाकून राहत होतो. ९७ सालाची दंगल झाली मग बाबांनी ती जागा सोडून मुंबई उपनगर मध्ये रहायचं ठरवलं. हळू हळू मुंबईच रूप पालटत होत तसंच गाव हि त्याच कात टाकून नवीन रूपात सजत होतं.
गावातल्या प्रत्येक घरातून कोणीतरी मुंबईला नोकरी करायला असतोच. त्यामुळे गाव ही खुप लवकर बदललं. आदर्श ग्राम चा राष्ट्रपती पुरस्कार हि भेटला. पण शहराला असं काही पुरस्कार नाही भेटला. फारतर काही विषयामध्ये नाव यायचे. प्रदूषण मध्ये एवढा नंबर, अपघातात एवढा नंबर असं बरंच काही.
माणसाने त्याच घर सोडल्याशिवाय त्याची प्रगती होत नाही, त्यासाठीच गाव सोडायचा निर्णय हा योग्यच होता. त्यांची गरज वेगळी होती. या सर्व गोष्टी मध्ये माझं बालपण तर राहूनच गेलं. मी अजूनही तीच वाट बघतो, जेव्हा पण गावचा रस्ता लागतो. मला कधी आई दिसते असं होत.
सध्या corona ची भीती सर्वीकडे आहे. यात शहरे पूर्णपणे नापास झालीत असं नाही , पण गाव मात्र पास होताना दिसत आहे. सगळ्यांनी गावाकडे धाव घेतली, यात त्यांना कोणती स्वप्न पूर्ण करायची नव्हती, मुलांच्या भविष्याचा विचार नव्हता, कामाची ओढ नव्हती, मोठं काही करून दाखवायची जिद्द नव्हती. फक्त एकच आशा होती की गावी सुखरूप जाता यावं.
यासगळ्या धावपळीत एकच सत्य बाहेर येत ते म्हणजे जीवा पेक्षा काही मोलाचं नाही. जीव आहे तर सगळं आहे.यातही काही गावकऱ्यांनी शहरातल्या लोकांना गावात न घ्यायचा निर्णय घेतला. त्यांचंही बरोबरच आहे. पण या युद्धात रत्नागिरीचे एक गाव जिंकले, त्यांनी त्यांच्या शहराच्या लोकांना बोलवून घेतलं त्यांची तपासणी केली त्यांना योग्य ते सुविधा देऊन qurantine केलं. गाव आणि शहर जरी वेगवेगळी असली तरी माणसे एकच आहेत. आपल्याच गावातला माणूस मुंबईमध्ये काम धंद्या साठी गेलाय याच भान या गावाने ठेवलं.
विकास झाला तर एका बाजूनेच होतो असं मला नाही वाटत. शहरात कितीही विकास झाला तरी त्यातला थोडाफार तरी प्रभाव गावात होतो. जिकडे गाव कमी पडत तिकडे शहरी उभी राहतात आणि जिकडे शहर कमी पडत तिकडे गावाने उभं राहिले पाहिजे.
मागच्या पिढीने पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करून जर शहरात यायचं ठरवलेला निर्णय योग्य असेल तर आताच्या पिढीने त्यांच्या पुढच्या पिढी साठी गावी जायचा निर्णय सुद्धा योग्यच असेल.
वेळ बदलेल, माणसे बदलतील पण गाव आणि शहर हे त्यांच्याच ठिकाणी राहतील. त्यांचे स्वरूप बदललेले असणार. गावाने शहरांना अन्नधान्य द्यावं, शहराने त्या बदल्यात विकासाच्या सोयी द्याव्यात. अशी अदलाबदल दोघांच्याही फायद्याची ठरते. ज्याच्याकडे जे आहे ते त्याने द्यावं. state is a manifestations of a man . या वाक्याप्रमाणे आपण प्रत्येकजण आपल्या भागाचे प्रकटीकरण करत असतो. corona च्या महामारीने सर्वाना त्यांची स्वप्ने सोडायला भाग पाडलीत. आता एकच स्वप्न आहे ते म्हणजे सुखरूप राहणं. गावचा निवांतपणा आता इकडे भासू लागला आहे. गाव आणि शहर आता दोघेही ठप्प आहेत. पण शेतकरी अजूनही राबत आहे कारण त्याला माहिती आहे आपण जर ठप्प झालो तर दोघेही उपाशी मरतील. भूकमारी हि महामारी पेक्षा भयंकर असते.
शेती हा जुगार प्रत्येकाला जमत नाही तिकडे कष्टाची नशा असायला लागते. शेतकरी जन्मतःच बाप असतो आणि माती उपजतच आई असते. त्यांची जागा तीच. आईची माया आणि बापाचा कणखरपणा असेल तरच शेती करावी.
पण याच शेतकऱ्याची पिढी शहरात राहून मोठी स्वप्न बघत होती. त्याच्या पिढीला आता स्वप्नात बदल करावासा वाटतोय. आता या पिढीचे स्वप्न मोठं घरे नसतील, बंगले, बँक बॅलन्स हि नसेल. तर जे आहे ते चांगल आणि श्वाश्वत असावं. आणि पुढच्या पिढीनेही निरंतर सुखरूप आणि उत्तम जगावं हेच असेल.