चैतन्य लहान होता, त्याला दंगामस्ती करायला खूप आवडायचं. त्याचा तो आवडता खेळ. खूप खेळायचा दम लागे पर्यंत खेळायचा, आणि दमला कि घरी येऊन जेवून झोपून जायचा. हेच काय त्याच जगणं होतं . 

मग हळू हळू मोठा झाला त्याला शाळेत पाठवायचं ठरलं. याला काय माहिती शाळा काय असते, नवीन माणसं ,नवीन जागा बघून घाबरला , लागला रडायला ,”अरे गप गप किती रडणार” समजावून बघितलं काही ऐकेना.
कसाबसा पहिला दिवस काढला आणि सरळ जाऊन आईच्या कुशीत परत रडला. “मला नाही जायचं शाळेत” असं रडत रडत बोलत होता.    

           त्याला समजावून दुसऱ्या दिवशी परत शाळेत पाठवलं, मग हळू हळू त्याच रडणं बंद झालं, पहिल्या सारखा खेळायला लागला, झाली याची मस्ती सुरु. मग पहिलीला आला आत्तापर्यंत तर सगळं मस्त होतं अभ्यास नाही केला तरी चालायचं. 

मग त्याच्या मागे अभ्यासाचा सपाटा चालू झाला, शाळेतून आला कि पहिला खेळायला जायचा हळू हळू ते बंद झालं, “आधी अभ्यास कर मग हवं तेवढं खेळ”. असा हुकूम येऊ लागला. त्याची अवस्था अगदीच दयनीय झाली पण काही करताही येत नव्हतं, हट्ट धरला कि झोडपून जायचा.

मग त्याला समजवायचे ,” अरे अभ्यास नाही केला तर मोठा कसा होणार. तू?”. “अभ्यास कर चांगले मार्क पाड मग हवं तेवढं खेळ”. त्याला खेळायची हौस पण घरची कडक शिस्त अभ्यास एके अभ्यास.
मग काय घरी आल्यावर अभ्यास करायचा अभ्यास पण इतका असायचा कि खेळायची वेळ च भेटायची नाही जेवून झोपून जायचा.       

            हळू हळू मोठा झाला ९ वी आला. सगळे म्हणाय लागले, पुढचं वर्ष दहावी आहे खूप अभ्यास कर आत्ता पासूनच. म्हणजे दहावी सोप्पी जाईल. चांगले मार्क्स मिळवं मग काय टेन्शन नाही. त्याला समजेना हे कसल्या टेन्शन बोलत आहे.
त्याच खेळायचं मन कुठेतरी खात होत, घरच्या पुढे त्याच खेळणं पण बंद झालं होत पण तरी लपून काहीवेळा खेळायला जात असे.  घरच्यांना वाटे त्याने २४ तास अभ्यास करावा. सतत अभ्यास अभ्यास ऐकून त्याचं मन अभ्यासावरून विटल होत.

घरच्या च्या मनासाठी त्याने ९ वी मध्ये ७०% मिळवले. त्याचे वडील फारसे खूष नव्हते कारण त्यांच्या मित्राच्या मुलाला ९५% मिळाले होते. “हे काय मार्क्स आहेत?” असं बोलून खेकसले त्याच्या अंगावर.
चैतन्य ला कळून चुकलं होत, त्याच्या वडलांना  फक्त मार्क्स हवेत बाकी काही नको.      

          उन्हाळ्याची सुट्टी त्याने vaccation क्लास मध्ये घालवली. दहावीला आला होता. आधीच क्लास मध्ये १० वीची ओळख करून दिली, “मुलांनो तुम्ही आता दहावीला आहात , खूप अभ्यास करा, खूप वाचन करा, जरासाही वेळ इकडे तिकडे  वाया घालवू नका, खूप महत्वाचं वर्ष आहे हे, यावरूनच तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्य ठरवायचं आहे,


एकदा का दहावी झाली कि मग टेन्शन नाही.” “मग हवं तसं जगा “. चैतन्य च्या मनात भलतंच काहीस आलं त्याने हात वरती केला. गुरुजींनी त्याला विचारलं, “हा बोल, काय विचायचे आहे”


चैतन्य म्हणाला, “गुरुजी तुम्ही कोणत्या टेन्शन बद्दल विचारता आहात?” त्याने साधा सरळ प्रश्न विचारला, पण मास्तर चिडले त्यांना वाटलं, ‘काय हा उद्धट प्रश्न?’ ते ओरडले, “अरे कसलं टेन्शन म्हणून काय विचारतो, जाऊन घरी विचार तुझ्या आई वडलांना मी जर नापास झालो तर काय होईल? मग समजेल कसलं टेन्शन”             

    घरी येऊन विचारलं त्याने बाबांना, “दहावी मध्ये मी नापास झालो तर, तर काय होईल?”. त्याचे वडील आधीच जमदग्नीची अवतार त्यात त्याने हे असे धाडस केले, मग काय! रडे पर्यंत मार खाल्ला. रडत रडत आईकडे आला,
आईने समजावले,” अरे प्रत्येकाची इच्छा असते आपल्या मुलाने चांगले गुण मिळवून पास व्हावं  . यात तू नापास झालो तर, असं बोलल्यावर आला असेल त्यांना राग” “जाऊदे घे खाऊन आणि कर अभ्यास” असं बोलून आई तिच्या रोजच्या कामाला लागली. दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये मास्तरांनी विचारलं, “काय रे, कळालं का, कसलं टेन्शन असतं ते?” “होय मास्तर” असं उत्तर निमूटपणे दिले. दहावीच्या सुरवातीलाच त्याला टेन्शन काय ते आलं.

पण त्याच मन सारखं खेळाकडे वळत असे,धड अभ्यासही होत नसे आणि धड खेळायलाही भेटत नसे. चांगले मार्क्स मिळावे म्हणून त्याच्यावडलांनी त्याला मोठ्या क्लास मध्ये घातले.
शाळा सुटली कि घरी जाऊन जेवण करीत, थोडा वेळ अभ्यास करून झोपत असे जरा झोप झाली की त्याच ओशाळलेल्या डोळ्यांची झोप घालवून क्लासला जायची धावपळ करी.
तिकडून आला की जेवण करून झोपी जाई. मग आज दिलेल्या क्लास चा अभ्यास उद्या दुपारी करी, पण दुसऱ्या दिवशीच्या शाळेचा अभ्यास पण तेव्हाच करत असे.
त्याच वेळेला दोन प्रकारचा अभ्यास त्याला काही जमेना, मग त्याने रात्री अभ्यास करायचं ठरवलं. सकाळ ते दुपार शाळा, तिकडून घरी येऊन जेवण करून अभ्यास ते संध्याकाळी परत क्लास तिकडून आला कि परत अभ्यास. हेच चालू झालं.          

      त्याची धावपळ त्याला जाणवत होती पण सांगणार कोणाला. सतत वाढत जाणारा अभ्यास हि त्याला ओझं वाटू लागलं होतं. पण एक शब्द काढला तर दम मिळत असे.
अभ्यासाचा ताण, होणारी धावपळ, हे इतकं प्रचंड वाढलं होत की, त्याच्या आईवडलांना चैतन्य आता २४ तास फक्त अभ्यास करताना दिसत होता. एक दिवस त्याला हे सगळं नकोस वाटलं, फेकून फाडून टाकावी पुस्तकं. इतका वीट आला होता.

सामाईक परीक्षा नुकतीच पार पाडली होती, ७९% गुण मिळाले होते. त्याचे बाबा खूष तर होते पण फारसे नव्हते. प्रगतीपुस्तक हातात आल्यावर त्यांनी चैतन्यला एक अट घातली, “तुला हवं ते देतो, पण मला ९०% पेक्षा जास्त मार्क मिळवून दे”. चैतन्य वाटलं हे काय बोलून गेले बाबा हवं ते देतो.

चैतन्य बोलला,” मग मी खेळायला जाऊ, खूप दिवस झाले खेळलो नाही”. त्याचा उत्साह बघून त्यांना पण नाही बोलणं जमल नाही. “हो, पण परीक्षा झाल्यावर” अशी वेगळीच अट घातली. थोडा हिरमुसून चैतन्य आपलं प्रगतीपुस्तक घेऊन गेला.      

            चला दहावी नंतर तरी खेळायला भेटेल. या आशेने अभ्यास सुरु केला. दहावीचा निकाल लागला आणि चैतन्य ला ९२% मिळाले. घरच्यांना खूप आनंद झाला. चैतन्यलाही नंतरचे दोन महिने रोज खेळायला जात. इतक्या वर्षाचं साठवलं होत ते सगळं काही बाहेर काढत होता.

त्याला खेळायचं होत अजून, वाटलं एकदा बोलून बघावं बाबांशी. त्याने सांगितलं मला खेळायचं आहे. बाबा म्हणाले, “हा पोरकट खेळ बस झाला, आता इंजिनियर बनायचं आहे तुला”.
चैतन्य म्हणाला, “पण बाबा मला खेळायचं आहे, मी त्याच्या मध्ये carrier करू?”. एक सन दिशी त्याच्या कानाखाली पडली.
आणि एक आकाशवाणी त्याच्या बाबानी केली, “तुला खेळायला जन्माला नाही घातलं, मी राबराब राबतो, हा तुझा पोरखेळ बघण्यासाठी? “.

आताकुठे त्याला आपल्या जन्मा मागचं कारण कळालं. तशी प्रत्येकाची  इच्छा असते आपला जन्म नेमका कश्यासाठी झाला आहे हे जाणून घ्यायची.
धन्य हा चैतन्य आणि त्याहून धन्य त्याचे बाबा ज्यांनी त्याला इतक्या सहजतेने त्याच्या जन्माचं कारण सांगितलं. इतिहास वाचला होता त्यात इंग्रजांनी केलेले जुलूम आठवले. ते आठवत असतानाच त्याच Admission engineering मध्ये झालं.

पहिले दोन वर्ष कसेबसे घालवले. पण त्याला त्यात काही राम वाटेना. त्याने engineering  सोडायचा विचार केला. पण ते सोडून करणार काय? त्याला अजूनही खेळायची खूप इच्छा होती. पण त्याचा हा विचार पटेल त्याच्या बाबांना. अर्थातच न पटणारा होता. परत त्याने माघार घेतली आणि मन रमवायला लागला पण मग रमतय  कुठे?              

      पठ्या चक्क नापास होऊन घरी आला. तेव्हा त्याला शाळेतले मास्तर आठवले, नापास झालो तर काय होईल? हे त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्याला आज मिळणार होते. इतक्या वर्षांनी मुलाला बघून त्याच्या आईने त्याला जवळ घेतलं, तो पास झाला, नापास झाला याच व्यवहार ज्ञान तिला नव्हतं.

तिला तिचा मुलगा सुखात हवा होता. त्याचे बाबा संध्याकाळी घरी आले, चैतन्य कडे बघितलं आणि काही न बोलता आपल्या कामात व्यस्त झाले.
मुलगा नापास होऊन घरी आलाय हे खूप मनाला लागलं होतं. त्यात त्यांच्या मित्राची मुलगी M.B.B.S  होऊन घरी आली होती. त्यामुळे राग असणं साहजिक आहे.

दुसऱ्या दिवशी काय करावं? या विचाराने सहज तो बाहेर पडला तर मुले खेळात होती, त्यालाही जावंस वाटलं तो दिवस मनभरून खेळून घेतलं. घरी काही कामा निमित्त त्याचे वडील लवकर आले चैतन्य ला खेळताना बघून त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली. 

               २०-२१ वर्षाच्या चैतन्यला खेचून घेऊन घरात आणलं, ज्या बॅटीने खेळत होता त्याच बॅटीने त्याला फोडून काढलं. आणि त्या बॅटीचे तुकडे तुकडे केले. होता नव्हता सगळा राग त्यांनी बाहेर काढला.
याच लायकीचा आहेस तू , हीच तुझी औकात, बस आयुष्यभर खेळत. असं बोलून निघून गेले. चैतन्यला त्याचा जन्म वाया गेल्या सारखं वाटलं.

त्याचे बाबा जेव्हा संध्याकाळी घरी आले. तेव्हा चैतन्य नव्हता. एक बॉडी होती ज्याच्याकडे बघून त्यांची बायको रडत होती. त्यांचा चैतन्य चैतन्या मध्ये विलीन झाला होता.  

‘जाता जाता चैतन्याने गुन्हा केला होता, शर्यतीमध्ये धावायचा विचार सोडला होता, वेगळी वाट काढून नवीन काही बघत होता,त्याच्या जन्माचं कारण तो बदलू पाहत होता, ‘जाता जाता चैतन्याने गुन्हा केला होता’

टेन्शन?

By Chandrakant Ubhe

like to Reading New thing, Travel, listening music and watching movie

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *